- पक्ष ठरायचा बाकी, पण उमेदवार आधीच ठरले!…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभागरचना आणि आरक्षण यादी जाहीर होताच शहरातील राजकीय तापमान अचानक वाढले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर न झालेला असतानाही इच्छुकांनी सोशल मीडियावरून उमेदवारीची धडाकेबाज घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसह विविध सोशल प्लॅटफॉर्मवर “एकच वादा, एकच दादा”, “विकासाचा ध्यास, आमचा श्वास”, “नगरसेवकपदासाठी सज्ज” अशा घोषणा उमटू लागल्या आहेत. अनेकांनी शुभेच्छांचे संदेश, व्हिडिओ आणि प्रचार पोस्टर प्रसारित करून स्वतःची उमेदवारी परस्पर जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे काहींनी थेट आपल्या नेत्यांना उद्देशून सोशल मीडियावरच “मला संधी द्या” असे आवाहन केले आहे. काहींनी “मी का योग्य उमेदवार आहे” याचे समर्थन देणारे लेख आणि व्हिडिओही पोस्ट केले आहेत.
दरम्यान, काही प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांनी आपल्या सौभाग्यवतींची उमेदवारी जाहीर केली आहे. तर काहींना अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने त्यांनी खुलेपणाने नाराजी व्यक्त केली आहे. काही जणांचे पोस्ट्स “पक्षाने न्याय द्यावा” या भावनेने व्हायरल होत आहेत.
राजकीय समीकरणे अजून स्पष्ट नसली तरी, सोशल मीडियावर उमेदवारीच्या झेंड्यांची चढाओढ सुरू झाल्याने आगामी निवडणुकीचा थरार आता आभासी दुनियेत आधीच सुरू झाल्याचे चित्र आहे.












