- विविध विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्याने; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ, जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष आणि कमला शिक्षण संस्थेचे प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने “यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला” उत्साहात संपन्न झाली.
या व्याख्यानमालेचे आयोजन कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पहिल्या पुष्पाचे प्रमुख वक्ते डॉ. रुस्तुम दराडे यांनी ‘मुलाखत तंत्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. मुलाखतीसाठी तयारी कशी करावी आणि विविध तंत्रांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान टिप्स दिल्या.
दुसऱ्या पुष्पात प्रमुख वक्ते मुबीन तांबोळी यांनी ‘हास्यहंडी धमाल’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. बी.एड.च्या सूक्ष्म अध्यापनापासून सराव पाठापर्यंत विद्यार्थ्यांच्या अनुभवांवर आधारित हा विनोदी प्रयोग प्रेक्षकांना भावला. स्वतःला ओळखा आणि दुसऱ्यासाठी प्रेरणा बना, असा त्यांनी अर्थपूर्ण संदेश दिला.
तिसऱ्या पुष्पात डॉ. धनाजी भिसे यांनी ‘भारतीय ज्ञान परंपरा – काळाची गरज’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी प्राचीन काळातील मानवापासून आधुनिक युगातील परिवर्तनाची साखळी मांडत भारतीय संस्कृतीतील ज्ञान परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्य केंद्रवाहक प्रा. सुशील भोंग यांनी केले. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम होत्या. कार्यक्रमाला शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












