- अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ३९ गॅस सिलेंडर जप्त; दोघे गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- तळवडे येथील ज्योतिबा नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस रिफिल करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत २ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चिखली पोलीस ठाण्यात गुन्हानोंदविण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस शिपाई मितेश मोहन यादव (वय ३४, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहूल गयाप्रसाद ठाकुर (वय २९) आणि कमल पुरुषोत्तम ठाकुर (वय ३२), दोघे रा. ज्योतिबा मंदिराजवळ, ज्योतिबा नगर, तळवडे, हे दोघेही मुळचे आग्रा (उत्तर प्रदेश) येथील आहेत.
११ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता, आरोपींकडे कोणताही परवाना नसताना त्यांनी घरगुती गॅस सिलेंडरमधून कमर्शियल सिलेंडरमध्ये रिफिलिंग करत असल्याचे आढळले. या कारवाईत एकूण ३९ गॅस सिलेंडर (३३ घरगुती आणि ६ कमर्शियल), एक वजन काटा, दोन लोखंडी रिफिलर पिन, एक पक्कड, भारत गॅस एजन्सीच्या ३० पावत्या आणि एक तीनचाकी वाहन असा एकूण २,२९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक देवकर यांच्या पथकाने चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली. आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे.












