- या उपयोगासाठी भाडेपट्ट्याने भुखंडाचे होणार वाटप...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) जमीन व मालमत्ता विभागामार्फत विविध शैक्षणिक, व्यावसायिक, वैद्यकीय आणि सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेल्या भूखंडांचा ई-लिलाव जाहीर करण्यात आला आहे. या लिलावात भोसरी, चिखली, रहाटणी आणि रावेत या परिसरांतील १५ हून अधिक भूखंडांचा समावेश आहे.
या सर्व भूखंडांचे ८० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिम्मत खराडे यांनी दिली.
भोसरी परिसरात सेक्टर १ आणि १२ मध्ये माध्यमिक व प्राथमिक शाळा तसेच रुग्णालयासाठी जागा उपलब्ध असून, सेक्टर १० मध्ये व्यावसायिक गाळे, सेक्टर ३ मध्ये सार्वजनिक सुविधा आणि सेक्टर २ मध्ये वाचनालय व संगीत विद्यालयासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच सेक्टर ७ मध्ये फॅसिलिटी सेंटर उभारण्यात येणार असून, सुमारे ११ हजार ८७ चौरस मीटर जागा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
व्यावसायिक हेतूसाठी चिखली, रहाटणी आणि रावेत येथील भूखंडांचा समावेश आहे. चिखलीतील सेक्टर २०, रहाटणीतील सेक्टर ३८, रावेतमधील सेक्टर २९, तर बोऱ्हाडेवाडी परिसरातील सेक्टर ११ आणि ४ येथेही भूखंड उपलब्ध आहेत.
संबंधित सर्व भूखंडांसाठी ई-लिलाव प्रक्रियेसाठी अर्ज ७ नोव्हेंबरपासून २७ नोव्हेंबरपर्यंत पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर करता येतील. तांत्रिक पात्र अर्जदारांची यादी ९ डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल, तर १० डिसेंबर रोजी ई-लिलाव प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.












