- १७ गुन्हे दाखल, १९ लाखांचा दंड वसूल..
- बिल्डर, राजकीय पदाधिकारीही कारवाईच्या भोवऱ्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- महापालिका हद्दीत अनधिकृत बॅनर, फ्लेक्स, किऑक्स आणि पोस्टर्स लावण्यास कडक बंदी असतानाही शहरात या नियमांचा उघडपणे भंग केला जात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत १७ गुन्हे दाखल करून १९ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या कारवाईत काही राजकीय पदाधिकारी आणि नामवंत बिल्डर्सचाही समावेश असल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांत ११ हजार ६९८ अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर जप्त, तर ९ हजार ८२० किऑक्स हटवण्यात आले आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथकाद्वारे ही कारवाई केली जात आहे. अनधिकृत जाहिराती, पोस्टर्स, गॅन्ट्री, बॅनर, फलक इत्यादींवर सातत्याने कार्यवाही सुरू आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी शहरात बेकायदेशीर फ्लेक्स लावल्याने कारवाई अधिक गतीमान करण्यात आली आहे. या फ्लेक्समुळे शहराचे सौंदर्य विद्रूप होण्याबरोबरच वाहतुकीतही अडथळे निर्माण होत होते.
आतापर्यंत शहरातील सर्व भागांमधील वीस हजारांहून अधिक फ्लेक्स आणि किऑक्स हटवले गेले आहेत. १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, दंडात्मक कारवाईत १९ लाख ५८ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
या यादीत काही नामवंत बिल्डर आस्थापनांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यावर दोन प्रकरणांत ३० हजारांचा दंड, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा शहराध्यक्ष शेखर काटे यांच्यावर २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महापालिकेने नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे की, अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, फलक किंवा किऑक्स लावल्यास तातडीने दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.
“महापालिका हद्दीत अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री लावण्यास बंदी आहे. तरीही अशा प्रकारची बेकायदेशीर जाहिरातबाजी होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी असे फलक लावू नयेत.”
— राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका











