- बार्सिलोना येथे झालेल्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०२५’ मध्ये सहभाग….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख मजबूत केली आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे ४ ते ६ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०२५’ दरम्यान आयोजित ‘आंतरराष्ट्रीय शहरी आणि प्रादेशिक सहकार्य (IURC) ग्लोबल थीमॅटिक नेटवर्किंग कार्यशाळेत’ सहभागी होण्यासाठी भारतातील सहा पायलट शहरांपैकी एक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आमंत्रित करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेत मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि सहशहर अभियंता बापू गायकवाड यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व केले. शहरी गतिशीलता, हवामान बदलास अनुरूप नियोजन, आणि शाश्वत वाहतूक यांसारख्या विषयांवर केंद्रित सत्रांमध्ये त्यांनी जगभरातील शहर प्रतिनिधींशी अनुभव आणि कल्पनांची देवाणघेवाण केली.
या कार्यशाळेदरम्यान ल्यूवेन, हॅम्बुर्ग आणि व्हिक्टोरिया यांसारख्या शहरांसोबत ‘वेस्ट-टू-एनर्जी’, ‘हरित वाहतूक प्रणाली’ आणि ‘स्मार्ट शहरी उपाय’ या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चांमधून जगातील अनेक शहरे पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी नवोपक्रम आणि भागीदारीच्या माध्यमातून कसे प्रयत्नशील आहेत याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
महानगरपालिका सध्या हवामान अनुकूल विकास, हरित गतिशीलता, कचरा व्यवस्थापन आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवित आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून महानगरपालिका जागतिक पातळीवरील सर्वोत्तम शहरी धोरणे आत्मसात करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील हा सहभाग पिंपरी चिंचवड शहरासाठी एक मोठी उपलब्धी असून, महानगरपालिका जागतिक दर्जाच्या शाश्वत आणि स्मार्ट शहरांच्या यादीत स्वतःची ओळख अधिक दृढ करत आहे.
बार्सिलोना येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सहभाग म्हणजे आपल्या शहराच्या प्रगत आणि शाश्वत विकास दृष्टिकोनाची जागतिक स्तरावरची दखल आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, हरित वाहतूक आणि नागरिकाभिमुख धोरणांच्या माध्यमातून आम्ही जागतिक दर्जाचे, राहण्यायोग्य आणि भविष्याभिमुख शहर उभारण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहोत.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला या जागतिक परिषदेत स्थान मिळणे हे शहराच्या शाश्वत विकासाच्या प्रयत्नांची दखल आहे. या माध्यमातून आम्हाला विविध देशांतील शहरांचे यशस्वी अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्याची संधी मिळाली, जी भविष्यातील प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरेल.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
शाश्वत वाहतूक, स्वच्छ ऊर्जा आणि नागरिककेंद्रित नियोजन ही आजच्या शहरी विकासाची गरज आहे. या परिषदेमधील चर्चांमुळे आम्हाला जागतिक दर्जाच्या संकल्पना आणि उपाययोजना शहरात लागू करण्याची प्रेरणा मिळाली.
– बापू गायकवाड, सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.












