न्यूज पीसीएमसी नेटवर्क
ताथवडे (दि. १५ नोव्हेंबर २०२५) :- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ताथवडेत पार पडली. या बैठकीत पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक तयारीसाठी सूचना केल्या. “शिवसेनेने केलेली कामे व प्रश्नांची सोडवणूक तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस शहर संपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख संजोग वाघेरे, महिला व युवा पदाधिकारी यांसह महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी उपस्थिती होती. प्रत्येक प्रभागात उमेदवारांची तयारी, संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणूक नियोजनाचा आढावा अहिर यांनी घेतला.
“एकदिलाने, एकमताने काम करा आणि शिवसेनेची ताकद तळागाळात पोहोचवा,” असे आवाहन करत त्यांनी सर्वांना तयारीस सज्ज राहण्याचे निर्देश दिले.











