न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- पुणे महानगरपालिकेने त्या शहरातील कचरा टाकण्यासाठी मोशीमधील नियोजित सफारी पार्कची जागा मिळावी, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला आहे. ज्या कुणा पुणेकराच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना आली असेल, त्याचे कौतुकच करावे लागेल! “जे जे सुंदर, ते माझे घर..! बाकी सारे मस्त कलंदर..! ” या वृत्तीने पुणेकर कसे वागतात? आपल्या शहरातील कचरा दुसऱ्या शहरात कसा काय टाकावा वाटतो? डेक्कन सारखा परिसर, मॉडेल कॉलनी, प्रभात रोड, आपटे रोड सारखे नाही, किमान आहे त्या वातावरणात तरी आम्हाला राहूद्यात, अशी टीका माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, ‘गेली दहा वर्षे पुण्याचा कचरा धुमसतोय. खरे तर यापूर्वीच याचा गांभिर्याने विचार करून पुणे मनपाने योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता. पिंपरी-चिंचवड शहर आता कुठे आकारास येवू लागलेय. या शहरातील कचरा मोशीतच पडतोय, त्याची विल्हेवाट लावताना येणाऱ्या दुर्गंधीने आधीच मोशीकर बेजार झालेत. कचराडेपोच्या दीड- दोन कि.मी. परिसरातील लोक आधीच हैराण झाले आहेत. माशा आणि तत्सम किटकांच्या होणाऱ्या त्रासाने गंधर्वनगर, संतनगर, बोऱ्हाडेवाडी वगैरे परिसरात रहावेसे वाटत नाही. याच परिसरात आता मोठ-मोठे गृहप्रकल्पही उभे राहत आहेत. आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचा प्रकल्पही अगदी शेजारीच साकारतो आहे, असे असताना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला आणि बुद्धिमान पुणेकरांना कचऱ्यावर दुसरी काही उपाययोजना करता आली नाही, हे विशेष आहे.
त्यातुनही पुणे मनपाचा हट्टच असेल, तर त्यांनी सर्व मोशीकरांचे स्थलांतर पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरात प्रभात रोड, भांडारकर रोड, आपटे रोड याठीकाणी करावे. तसेच येथील सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानप्रबोधिनी व एस.पी. महाविद्यालयात शिक्षण द्यावे, असे असेल तर आंम्हाला या प्रस्तावाचा विचार करता येईल. अन्यथा, मोशीकर नागरिक कधीही पुण्याचा कचरा इकडे येवू देणार नाहीत. कचरा डेपोच्या त्रासाने बाधित नागरिकांसह आम्ही सर्वजण याविरोधात तीव्र आंदोलन करू, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे अरुण बोऱ्हाडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.














