न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :- महापालिका आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्र. ३० मधील आरक्षणात अचानक बदल करण्यात आला. त्यावर या प्रभागातील नागरिकांना आक्षेप घेतला असून त्याबाबत महापालिका निवडणूक विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने ११ नोव्हेंबर रोजी घोषित आरक्षणानुसार ओबीसीची जागा ‘खुली’ होती; मात्र १७ नोव्हेंबरला कोणतीही हरकत किंवा सूचना नसताना ती ‘महिला’ अशी बदलली आहे. सर्वसाधारण जागाही ‘महिला’वरून ‘खुली’ करण्यात आली.
त्याबाबत निवडणूक आयोगाने कोणतेही प्रसिद्धिपत्रक, खुलासा किंवा पत्रकार परिषद न घेता आरक्षण बदल जाहीर केला, हा निर्णय अस्पष्ट आणि संशयास्पद आहे. प्रचाराची तयारी व खर्च झाल्यानंतर अचानक आरक्षणात बदल करणे अन्यायकारक असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
या निवेदनावर विशाल वाळुंजकर, अकील शेख, मनोज वाखारे आणि सुवर्णा कुठे यांनी आयोगाच्या निर्णयाचा निषेध करून, आवश्यक असल्यास आंदोलन व न्यायालयीन लढाई उभारण्याचा इशाराही दिला आहे.











