- इथे विकत मिळेल यादी; असा आहे मतदार यादीचा कार्यक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची ३२ प्रभागांची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी गुरुवार (दि. २०) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध राहणार असून त्याच दिवशी यादीची विक्रीही सुरू होणार आहे.
१ जुलैपर्यंतची नावेच यादीत..
महापालिकेच्या मतदार यादी कक्षाने पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे फोडून प्रभागनिहाय यादी तयार केली आहे. त्यात १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांचीच नावे आहेत. त्यानंतर नोंदणी झालेल्यांना महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यादी प्रसिद्धीचा दिवस बदलत राहिला…
या यादीची घोषणा ६ नोव्हेंबरला होणार होती. त्यानंतर दिनांक बदलून १४ नोव्हेंबर निश्चित करण्यात आला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा दिवस बदलल्याने यादी अखेर २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होत आहे. प्रभागनिहाय मतदार यादी आयोगाच्या संगणक प्रणालीवर अपलोड झाल्यामुळे मार्ग मोकळा होणार आहे.
हरकती–सूचना लेखी स्वरूपात स्वीकारणार…
मतदार यादीसंदर्भातील हरकती आणि सूचना २० ते २७ नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह (पहिला मजला), गांधीनगर, पिंपरी, महापालिकेची सर्व आठ क्षेत्रीय कार्यालये ही दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. हरकतींवरील निर्णयानंतर अंतिम मतदार यादी ५ डिसेंबरला, मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी ८ डिसेंबरला आणि मतदान केंद्रनिहाय यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.
यादी विक्री व केंद्र…
प्रभागनिहाय मतदार यादीची प्रत विक्रीसाठी गुरुवारपासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात उपलब्ध होणार आहे. मतदान केंद्र ठिकाणी निश्चित करण्याचे काम संबंधित अधिकारी अंतिम टप्प्यात करत असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
मतदार यादी कार्यक्रम…
प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: २० नोव्हेंबर
हरकती–सूचना स्वीकारणे: २० ते २७ नोव्हेंबर
अंतिम मतदार यादी: ५ डिसेंबर
मतदान केंद्रांची यादी: ८ डिसेंबर
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी: १२ डिसेंबर











