- राष्ट्रवादीचे दहा माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?..
- अजितदादा गळती कशी थांबवणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :- पार्थ पवार प्रकरणानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) बचावात्मक स्थितीत गेल्याचे चित्र दिसत असताना भाजपाने या परिस्थितीचा फायदा घेत महापालिका निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याला कमकुवत करण्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. शहरात महापालिकेचे वातावरण तापले असताना भाजपात पक्षांतराची शक्यता असलेली हालचाल गतीमान झाली आहे. राष्ट्रवादीचे तब्बल दहा माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, पक्षप्रवेशाच्या तयारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार ही गळती कशी थांबवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
२०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाने ७७ जागा मिळवत सत्ता स्थापन केली होती, तर राष्ट्रवादीकडे ३२ जागा होत्या. मात्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कमकुवत पडल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यातच भाजपाचे शहरातील आमदार व अलीकडील बिहार निवडणुकीतील विजयामुळे पक्षामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ‘शंभर पार’ नगरसेवक निवडून आणण्याचा पक्षाचा निर्धार आणखी मजबूत झाल्याचे दिसते.
या ध्येयपूर्तीकडे वाटचाल करताना राष्ट्रवादीच्या तगड्या उमेदवारांना भाजपात आणण्याची रणनीती आखली जात आहे. विशेषतः चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार असल्याने राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक भाजपाच्या गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०१७ मध्ये जसे इच्छुकांनी शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश करून लाटेचा फायदा घेतला, तसाच ट्रेंड यंदा पुनरावृत्त होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
भाजपातील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षातील काही निष्ठावंत कार्यकर्ते मात्र बाहेरून येणाऱ्यांना तिकीट मिळू नये, अशी मागणी करत आहेत. ‘भाजपा हा विचारांवर उभा असलेला पक्ष आहे, फक्त फायद्यासाठी इनकमिंग नको,’ अशी भूमिका ते व्यक्त करत आहेत. तरीदेखील ज्या प्रभागांत राष्ट्रवादीची मुळे मजबूत आहेत, त्या ठिकाणीच बाहेरून उमेदवार आणण्याचा भाजपाचा प्लॅन असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, “शहरात शत-प्रतिशत भाजपासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा हून अधिक माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यांनी पक्षप्रवेशाची इच्छा दर्शवली असून वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील.”
महापालिका निवडणूक जवळ येत असताना दोन्ही पक्षांतील हालचालींमुळे पिंपरी-चिंचवडचे राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.











