- निवडणूक विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (क्रमांक १) प्रदीप जांभळे पाटील यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची मूळ विभाग असलेल्या राज्य वस्तू आणि सेवा कर (GST) विभागात बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि. १७) सायंकाळनंतर त्यांना कार्यमुक्त केले असून ते मंगळवारी (दि. १८) नवीन पदावर रुजू झाले आहेत.
जांभळे पाटील यांच्या कार्यकाळात महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करणे तसेच आरक्षण सोडतीचे महत्त्वाचे नियोजन त्यांच्या जबाबदारीत होते. त्यामुळे त्यांची कार्यमुक्ती ११ नोव्हेंबरपर्यंत थांबवण्याची विनंती आयुक्त हर्डीकर यांनी शासनाकडे केली होती. निवडणूक संबंधी सर्व कामे पूर्ण झाल्याने त्यांची औपचारिक कार्यमुक्ती करण्यात आली.
दरम्यान, जांभळे पाटील यांच्या अखत्यारीतील निवडणूक विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जांभळे पाटील यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी कोण नवीन अधिकारी नियुक्त होणार, याबाबत महापालिकेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.











