- प्रतिनियुक्तीवाल्यांचे वर्चस्व?; स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांचा संताप उफाळला आहे. नुकतेच महापालिकेत प्रतिनियुक्तीवर रुजू झालेल्या उपायुक्त व्यंकटेश दुर्वाश आणि चेतना केरुरे यांना थेट अग्निशमन आणि मध्यवर्ती भांडार विभाग या अत्यंत महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी देण्यात आली. परिणामी, आधीपासून ही जबाबदारी संभाळणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांना दुय्यम ठरवण्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या बदल्यांनंतर सहाय्यक आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या जागी अग्निशमन विभागाची जबाबदारी उपायुक्त संदीप खोत आणि मध्यवर्ती भांडार विभागाची जबाबदारी सीताराम बहुरे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, केवळ दोन आठवड्यांतच या दोन्ही विभागांचा पदभार त्यांच्या हातातून काढून घेऊन प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला.
यामुळे मनपा वर्तुळात तीव्र नाराजी पसरली असून “स्थानिक स्वराज्य संस्था नव्हे, तर मंत्रालयच वाटायला लागले आहे… स्थानिक अधिकार्यांवर अन्याय करून प्रतिनियुक्त अधिकारीच वरचढ ठरत आहेत,” अशी टीका खुलेआम होऊ लागली आहे.
महापालिकेत महत्त्वाचे निर्णय, जबाबदाऱ्या आणि विभागांचे वाटप नेहमी स्थानिक अधिकाऱ्यांच्या अनुभवावर आधारित व्हावे, अशी अपेक्षा असताना प्रतिनियुक्ती अधिकाऱ्यांना थेट मोठमोठे विभाग देण्यामागील कारणे काय, असा प्रश्न कर्मचारीवर्ग आणि अधिकाऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
मनपातील प्रशासकीय व्यवस्थेत प्रतिनियुक्तीचा वाढता प्रभाव आणि स्थानिक अधिकाऱ्यांची घटती भूमिका हा मुद्दा आगामी काळात अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.











