- लाखाच्या जवळपास दुबार मतदार नोंदी उघडकीस..
- इच्छुकांची जीव टांगणीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २०) जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी उघडकीस आल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील एकूण १७ लाख १३ हजार ८९१ मतदारांपैकी तब्बल ९२ हजार ६६४ दुबार नावे आढळल्याची माहिती प्रशासनातून समोर आली आहे. स्थलांतर, पत्ता बदल आणि ऑनलाइन नोंदणीतील अडचणींमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शहरातील ३२ प्रभागांसाठी मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रारूप याद्यांवरील हरकती व दुरुस्त्या नोंदविण्यासाठी २० ते २७ नोव्हेंबर हा कालावधी देण्यात आला असून, ‘अ’ ते ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांसह मुख्यालयातील सावित्रीबाई फुले सभागृहात स्वतंत्र कक्ष उघडण्यात आले आहेत. चुकीची नावे, दुबार नोंदी, पत्ता तफावत किंवा नाव वगळल्यास नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
२०१७ मधील महापालिका निवडणुकीत शहराची मतदार संख्या ११ लाख ९२ हजार इतकी होती. गेल्या पावणे नऊ वर्षांत लोकसंख्यावाढ, नव्या वसाहती आणि नवमतदारांच्या नोंदीमुळे मतदार संख्येत तब्बल पाच लाखांहून अधिकांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये स्थलांतरित आणि वगळण्यात आलेली १७४० नावेही समाविष्ट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दुबार नावे शोधण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे राबवली असून, आढळलेल्या ९२ हजार ६६४ नोंदींची आगामी काळात प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे. एकाच व्यक्तीची नाव नोंद दोन ठिकाणी आढळल्यास त्या मतदारास एकच मतदान करता यावे म्हणून मतदार याद्यांमध्ये दोन चिन्हे दाखवली जाणार आहेत. तसेच अशा मतदारांकडून हमीपत्रही घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
या मोठ्या प्रमाणातील त्रुटींमुळे प्रशासनाने नागरिकांना स्वतःच्या प्रभागातील मतदार यादी काळजीपूर्वक तपासण्याचे आणि योग्य ते बदल वेळेत नोंदविण्याचे आवाहन केले आहे.












