- अर्बन स्ट्रीटमुळे शहराच्या वेगाला ब्रेक! रस्ते अरुंद, कोंडी वाढली..
- आमदार जगतापांच्या त्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड हे देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आहे. या औद्योगिक नगरीत सार्वजनिक वाहतुकीची अवस्था दयनीय आहे. शहरातील नियोजन शून्य रस्ते, अर्धवट सोडलेली पायाभूत कामे, बेजबाबदार प्रशासन यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः सत्ताधारी आणि विरोधकांनी विरोध केल्यानंतरदेखील अर्बन स्ट्रीट प्रकल्पावर करोडांचा खर्च करून शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक अरुंद करण्यात येत आहेत. आता चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून हा प्रकल्पच गुंडाळण्याच्या मागणीची अपेक्षा असताना त्यांनी थेरगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात शहरात विविध ठिकाणी अर्बन स्ट्रीट प्रकल्प उभारायचे आहेत, अशी घोषणा केली. आधीच वाहतूक कोंडीमुळे वैतागलेल्या नागरिकांमध्ये आता उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. त्यांच्याकडूनच या योजनेला पाठीशी घातले जात आहे की काय? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. महापालिका आणि वाहतूक पोलिस हे देखील यात मागे नाहीत.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त आहेत, असे एकेकाळी म्हटले जायचे. मात्र, मागील पाच वर्षात शहरातील प्रमुख मार्गावर अर्बन स्ट्रीट डिझाईननूसार रस्ते विकसित केले जात आहे. करोडो रुपयांचा चुराडा या योजनेवर होत आहे. यामुळे रस्ते अरुंद होवून फूटपाथ मोठे होवू लागले आहेत. रस्त्यालगत पदपथ, सायकल ट्रॅक, बैठक व्यवस्था, सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी प्रचंड होवू लागली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे रस्ते अरुंद करताना कुठलाही पर्यायी विचार केलेला नाही. अर्धवट प्रकल्प, रस्त्यांवरील अतिक्रमण, अनियंत्रित पार्किंग यामुळे शहर वाहतूक कोंडीत गुदमरते आहे. या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी आणि प्रशासन चुकीच्या योजनांवर करदात्यांचा पैसा खर्ची करण्यात धन्यता मानत आहे.
शहरातील चिंचवडगाव-लिंक रस्ता, दापोडी-निगडी महामार्ग, वाकड-नाशिक फाटा, काळेवाडी फाटा ते पिंपळे सौदागर, रावेत ते सांगवी अशा बहुतांश भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी असताना ती वाहने शहरात आल्यानेदेखील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. बीआरटी मार्ग, ग्रेडसेपरेटर, पदपथ आणि मेट्रो प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते अडवले गेले असून, यामुळे शहरातील प्रमुख मार्ग अरुंद झाले आहेत. रस्ते सुशोभीकरणाच्या नावाखाली रुंद रस्त्ते ‘अरुंद’ झाले आहेत. परिणामी अनेक मुख्य चौक आणि महामार्गांवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. कामगार वर्गाच्या प्रवेश आणि निर्गमन वेळांमध्ये म्हणजे सकाळी ७ ते ९ वाजता आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत शहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांची रांग लागलेली दिसते. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असूनही या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात वाहतूक पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे आमदार साहेबांनी या प्रकल्पाच्या विस्ताराची कास न धरता प्रकल्प रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिक करीत आहेत.
दरम्यान याप्रकरणी अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी आमदार शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
“अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रुंद रस्ते अरुंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक शारीरिक, आर्थिक त्रास होत आहे. भविष्यात बीआरटीप्रमाणे हा प्रकल्पसुद्धा बंद करावा लागला तर, ज्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी हा प्रकल्प राबविला त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेतली जाईल का? असे लेखी पत्र आम्ही कामाच्या सुरुवातीला दिले आहे. हा प्रकल्प म्हणजे नागरिकांच्या पैशाची अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी केलेली उधळपट्टी आहे. राज्य शासनाने उच्च पदस्थ अधिकारी किंवा निवृत्त न्यायाधीश यांची कमिटी नेमून या प्रकल्पाच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी आम्ही सरकारकडे विनंती करीत आहोत.
– मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ता…












