- पिंपरी-चिंचवड मतदार यादीवर सहा दिवसांत अडीच हजार आक्षेप..
- नावे गायब, प्रभाग बदल, तक्रारींचा भडिमार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असून सहा दिवसांत एकूण २ हजार ३५२ हरकती दाखल झाल्या आहेत. मंगळवारी (दि. २५) एका दिवसात ६५९ हरकती नोंद झाल्या.
प्रभागनिहाय मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात गेली, काहींची नावे यादीतून गायब झाली, तर काही मतदारांची नावे पुन्हा-पुन्हा दिसत असल्याच्या तक्रारी निवडणूक विभागाकडे सतत येत आहेत. अनेक माजी नगरसेवक व राजकीय पदाधिकारींचीही नावे यादीतून गायब झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक हरकती क क्षेत्रीय कार्यालयात (१८९) प्राप्त झाल्या आहेत. ग क्षेत्रीय कार्यालयात ११५, फ मध्ये ११२, ह मध्ये १०६, व मध्ये ७२, अ मध्ये २८, ड मध्ये ९ आणि ई क्षेत्रीय कार्यालयात ७ हरकती मिळाल्या आहेत. निवडणूक विभागाने स्वतःहून ६१ तक्रारी नोंदवल्या आहेत. एकूण ४१३ जणांनी “माझे नाव गायब” अशी तक्रार केली आहे.
दरम्यान, राजकीय पक्षांकडूनही प्रशासनावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडीने निषेध केला, तर भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनीही मतदार यादीतील त्रुटींची दखल घेण्याची मागणी केली आहे.
वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकारी आणि बीएलओंना प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. चुकीच्या नावांची तपासणी, दुबार नावे शोधणे आणि तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. तसेच, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एका उपायुक्तांची नेमणूक केली आहे.
नागरिकांसाठी महापालिका भवन, आठही क्षेत्रीय कार्यालये आणि पिंपरी व गांधीनगर येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात छापील मतदार यादी पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. तसेच, ऑनलाइन पाहण्यासाठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे.
मतदार यादीवरील हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवार (दि. २७) आहे.












