न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २९ नोव्हेंबर २०२५) :- यश हे साध्य नसून ती एक साधना आहे. आपल्याला एकदा जर हे साध्य मिळाले तर त्या साध्याची गोडी कमी होते. पण साधना जेवढी करु तेवढी कमीच पडते. हे समजावून सांगताना वारीचा दाखला देत, पंढरीची वारी करताना आपण जसे एक-एक मुक्काम गाठत पुढे जातो तसेच यशाचाही एक-एक मुक्काम गाठत पुढे जायचंय, ही साधना म्हणजेच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त ह.भ.प. डॉ भावार्थ देखणे यांनी केले.

श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाउंडेशन च्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आयोजित सृजनदीप व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प डॉ. भावार्थ देखणे यांच्या ज्ञानसंपन्न अमोघ वाणीतून ‘यशाची गुरुकिल्ली’ या विषयाने गुंफण्यात आले.
मनामधील वाद जाऊन संवाद व्हावा… नि संवादातून सुसंवाद घडावा यासाठी ही व्याख्यानमाला आहे. जीवनात आपण अनेक भौतिक सुखे मिळवितो पण अध्यात्माला मात्र आपण विसरतो. आजच्या काळात विद्यालयं वाढली आहेत पण विद्या मात्र लयाला जात आहे अशी खंत यावेळी देखणे यांनी व्यक्त केली. गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळं अमेरिकेने काढले हे आपल्याला माहीत आहे, पण आपल्या ॠषीमुनींनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत, हे आपल्याला माहीत नाही. त्यांनी जे ज्ञान आपल्याला दिले ते आपण विसरलो आहोत.
आधीच्या काळातील शिक्षणपद्धतीत पाठ्यपुस्तके नसून ग्रंथ होते. या ग्रंथांचा अभ्यास केला जात असे. या ग्रंथांमधून जे ज्ञान दिले जायचे ते आपल्याला हवे तसे जीवनात वापरता येत होते. आज आपण फक्त अभ्यास करतोय, ज्ञान मिळवित नाही. हे ज्ञान जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर आपली संस्कृती व आपले अध्यात्म समजून घेणं आवश्यक आहे. संतांच्या चळवळीचं कारण आपल्याला ज्ञानी बनवणं होतं. ज्ञानी म्हणजे जो अभ्यास आपण करतो तो आपल्या मनात किती झिरपला गेलाय व तो समाजहितासाठी कसा प्रकट होणार हे ज्याला कळले तो खरा ज्ञानी आणि तोच खरा यशस्वी!
अमेरिकेत शिकत असताना तेथील प्राध्यापक म्हणायचे, की भारतीय विद्यार्थी गणित व अध्यात्मात पुढे आहेत. म्हणजे जगामध्ये आपली ओळख ही अध्यात्मामुळे व संस्कृतीमुळे आहे. आपल्याला धोतर नेसता आलं पाहिजे, आपल्याला टोपी सरळ आहे की उलटी हे ओळखता आलं पाहिजे, अभंग आला पाहिजे, वासुदेवाची पदे, जात्यावरच्या ओव्या म्हणता आल्या पाहिजे. अमेरिकेतील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून सांप्रदायाचे काम करण्यासाठी भारतात आलो तर लोकांना वाईट वाटले होते, पण हे वाईट त्यांना भारत सोडून अमेरिकेत जाताना वाटले नाही. अशा भावना डॉ. देखणे सरांनी व्यक्त केल्या.
सृजनदीप व्याख्यानमालेचे अध्यक्ष पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज मोरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त उमेश महाराज मोरे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी प्रशासक ॲड. कैलास पानसरे, देहूचे माजी सरपंच मधुकर कंद, वि.का.स. सोसायटीचे माजी चेअरमन गुलाब काळोखे, शिवव्याख्याते प्रा.प्रदीप कदम, कामगार नेते मच्छिंद्र हगवणे, उद्योजक विश्वास गोलांडे, शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या सौ.शैलजा स्वामी, सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा विकास कंद, व्याख्यात्यांचा परिचय सहशिक्षिका सारिका जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका वृषाली आढाव तर वंदना मारणे यांनी आभारप्रदर्शन केले.
















