- मुदतवाढ अनं नव्या निविदांच्या प्रस्तावामुळे पारदर्शी कारभारावर प्रश्नचिन्ह?..
- मागील सहा वर्षांत कामावर जवळपास ६६ कोटींची उधळपट्टी..
- अजूनही पुतळयाचं काम पूर्णत्वास का येईना?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ मार्च २०२६) :- संपूर्ण हिंदुस्थानची अस्मिता असणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मोशी येथील १०० फूट उंच पुतळ्याच्या कामावर मागील सहा वर्षांत तब्बल ६५ कोटी ८१ लाख एवढा खर्च करण्यात आला आहे. मात्र, एवढा निधी खर्चूनही पुतळ्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. आता ते पूर्ण करण्याच्या नावाखाली ५० कोटी रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडून मांडण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रस्तावाला विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर निविदांचा प्रस्ताव तात्पुरता तहकूब ठेवण्यात आला आहे. तरीही, महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली सुरू असलेला हा कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि संभाव्य गैरव्यवहार कधी थांबणार ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला आहे.
पीएमआरडीएच्या जागेत प्रकल्प…
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील विनायकनगर येथे १०० फुटी उंचीचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामाला जानेवारी २०२० मध्ये मंजुरी दिली. हे काम मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आले असून त्यासाठी १२ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. काम सुरू करण्याचे आदेश १६ मार्च २०२० रोजी देण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी दीड वर्षांची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विनायकनगर येथे पुतळा उभारण्याऐवजी तो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) मोशी सेक्टर क्रमांक ५ व ८ मधील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्वेन्शन सेंटर (PIECC) परिसरात उभारण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी २० एकर जागेची मागणी केली होती. त्यानंतर पीएमआरडीएने २१ जुलै २०२३ रोजी सुमारे २.५० एकर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात दिली. सध्या या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरू आहे.
आतापर्यंत ६५.८१ कोटींचा खर्च..
बोऱ्हाडेवाडी येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळ्यासाठी अनुषंगिक कामांवर १२ कोटी ४७ लाख ४७ हजार रुपये खर्च करण्यात आले. या कामाची मुदत सप्टेंबर २०२१ होती; ती वाढवून मार्च २०२४ करण्यात आली. पुतळा उभारण्यासाठी ३२ कोटी ८४ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले असून या कामाची मुदत फेब्रुवारी २०२२ वरून डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली. दरम्यान, पीएमआरडीएच्या जागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी प्रथम १५ कोटींची निविदा काढण्यात आली, नंतर सुधारित निविदेत ५ कोटी ४१ लाखांची वाढ करण्यात आली. या कामावर आतापर्यंत २० कोटी ५२ लाख ५४ हजार रुपये खर्च झाले असून मार्च २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. संभाजी महाराजांच्या पुतळा आणि परिसर विकास कामांवर एकूण ६५ कोटी ८१ लाख रुपये खर्च करूनही प्रकल्प अपूर्णच आहे. त्यामुळे वारंवार मुदतवाढ मिळणारा ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
मुदतवाढीवर मुदतवाढ…
पुतळा परिसरातील विद्युत आणि स्थापत्य कामांच्या नावाखाली नव्याने दोन निविदांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. पहिल्या प्रस्तावानुसार स्थापत्य कामांसाठी १३ कोटी ७४ लाख ७६ हजार आणि विद्युत कामांसाठी १८ कोटी ६६ लाख, असा एकूण ३२ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च सुचविण्यात आला होता. दुसऱ्या प्रस्तावात पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईसाठी १३ कोटी ८४ लाख ८२ हजार आणि स्थापत्य कामांसाठी ६ कोटी ४२ लाख ३५ हजार, असा एकूण २० कोटी २७ लाख १७ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. मात्र, या निविदांमध्ये रिंग झाल्याचा आरोप करत विरोधकांनी दोन्ही प्रस्तावांना तीव्र विरोध केला. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांना महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असतानाही हे दोन्ही प्रस्ताव तहकूब ठेवावे लागले.
नव्या निविदांचा प्रस्ताव…
संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर मोठा खर्च करूनही काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या प्रकल्पाचे ठेकेदार मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांनी ३२ कोटी ३४ लाख रुपयांच्या कामासाठी ० टक्के दर दाखवल्याने या पैशांवर नेमका कोणाचा डोळा आहे, हे सांगण्याची गरज नसल्याचा आक्षेप विरोधकांनी नोंदवला आहे. तसेच विद्युत रोषणाईच्या १८ कोटी ६६ लाख रुपयांच्या कामासाठी ७ टक्के दर दाखविण्यात आला. या निविदांना मंजुरी देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असताना विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतल्याने स्थायी समितीला अखेर माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांच्या पुतळा विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, या प्रकरणामागे नेमका कोणाचा हात आहे, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुतळा परिसरातील काही अनुषंगीक कामे सध्या सुरु आहेत. त्यासाठी आर्थिक खर्चाला मान्यता मिळाल्यानंतर ही कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुतळा प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पुढील काही दिवसांत शंभर टक्के काम पूर्ण केले जाणार आहे. – अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता, स्थापत्य…











