- आमदार सुनील शेळके यांची लक्षवेधी; मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि.१२ मार्च २०२६) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे मांडून सरकारचे लक्ष वेधले. सुमारे ५५ ते ६० हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांबाबत गंभीर अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
मामुर्डी, शेलारवाडी, किवळे, कोटेश्वरवाडी, इंडस्ट्रियल एरिया, चिंचोली, काळेवाडी, सिद्धिविनायक नगरी व दत्तनगर या भागांचा कॅन्टोन्मेंटमध्ये समावेश असून सुमारे ८७ टक्के क्षेत्र रेडझोनमध्ये असल्याने नागरिकांना घर दुरुस्ती किंवा बांधकामासाठी परवानगी मिळत नाही.
कचरा व्यवस्थापन, सांडपाणी समस्या, कमी दाबाने पाणीपुरवठा, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक अडचणी यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे शेळके यांनी सांगितले. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली.












