- प्रभागनिहाय मतदार यादीत घोळ होऊनही मतदारांचा उठाव का नाही?..
- मग तुम्हाला निवडणूकच नकोय काय?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका झाल्याचे दिसत असून, अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाली आहेत. काही माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांची नावे यादीतून गायब झाल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या जात आहेत. आतापर्यंत सव्वापाच हजारांहून अधिक हरकती दाखल झाल्याची माहिती मिळते.
जानेवारी २०२६ मधील निवडणूक लक्षात घेऊन इच्छुकांनी यादी तपासणीला गती दिली असतानाच, सर्वसामान्य मतदार मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ६४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागात गेल्याचे अंदाज असूनही केवळ ३३३ मतदारांनीच आपले नाव नसल्याबाबत अर्ज दाखल केला आहे.
नाव मतदानाच्या दिवशी गायब असल्याचे लक्षात आल्यास संताप व्यक्त करण्यापेक्षा, ३ डिसेंबरपर्यंत मतदारांनी स्वतःची नोंद तपासून आवश्यक हरकती दाखल करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मदत केंद्रांवर मतदार नावे तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र याकडे मतदार दुर्लक्ष करीत आहेत. मग मतदारांना निवडणूकच नकोय काय, असा सवाल उपस्थित होत आहे.












