न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२५) :- वाकड, पेठ क्र. ३८/३९ मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभा २०२४ च्या प्रचारादरम्यान वाकड, कस्पटे वस्ती येथील ग्राउंडवर उपस्थित राहून स्थानिक नागरिकांना विकासाचे ठोस आश्वासन दिले होते. या ठिकाणी विरंगुळा केंद्र, खेळाचे मैदान, उद्यान हेही होणार होते. या बहुमुल्य भूखंडावर नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन देत जनतेचा विश्वास संपादित केला होता. परंतु, सत्ता मिळाल्यानंतर सरकारने आपला शब्द मोडत हा भूखंड थेट बिल्डरच्या हवाली केल्याचे निदर्शनास आले.
कस्पटे वस्ती,वाकड परिसरात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याऐवजी खासगी गटांना लाभ देणारा हा निर्णय स्थानिक जनतेच्या भावनांवर आघात करणारा असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर कस्पटे वस्ती,वाकडमधील संतप्त नागरिकांनी आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध आंदोलन सुरू केले आहे. स्थानिकांसाठी आरक्षित केलेली जागा बिल्डरच्या हवाली करण्याचा हा निर्णय अन्यायकारक असून, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे. हा निर्णय मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यास पिंपरी चिंचवड आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी पाठींबा दिला आहे.











