न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२५) :- हिंजवडीतील पंचरत्न चौकात दारूच्या नशेत बस चालवल्याने दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याची आणि चार जण जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना सोमवार, दि. ०१ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. आरोपी नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३३, रा. भोसरी) हा दारूच्या नशेत एमएच १४ एलएल ७२३३ क्रमांकाची मैत्रेय ट्रॅव्हल्स कंपनीची बस चालवत होता. त्याने शिवाजी चौकाकडून वाकड ब्रिजच्या दिशेने भरधाव वेगात येत पंचरत्न चौकात पादचारी व दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली.
या दुर्घटनेत अर्चना प्रसाद (८) व सुरज प्रसाद (६) या दोघांचा मृत्यू झाला. तर प्रिया चौधरी (१६), दुचाकीस्वार अविनाश चव्हाण (२६) हे गंभीर जखमी झाले असून नुर आलम आणि विमल ओझरकर हेही जखमी झाले आहेत. अपघातात दुचाकी, इलेक्ट्रिक DP आणि होर्डिंगचे मोठे नुकसान झाले.
ड्रायव्हर दारूच्या नशेत असूनही त्याची तपासणी न करता बस चालविण्यास दिल्याबाबत कंपनीचे मालक, सबवेंडर, मॅनेजर आणि सुरक्षा तपासणीस जबाबदार व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ नागनाथ गुजर याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि. ताकतोडे करत आहेत.











