- आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२५) :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, महापालिका निवडणुकांची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज सोमवारी (दि. १५) सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ही पत्रकार परिषद मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सद्यस्थिती, तयारी, संभाव्य वेळापत्रक तसेच आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण संकेत या पत्रकार परिषदेत दिले जाण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढवल्या असून, इच्छुक उमेदवार, पक्ष संघटना आणि प्रशासन सतर्क झाले आहे. अशा वेळी राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या परिषदेतून आचारसंहिता कधी लागू होणार याबाबत स्पष्ट संकेत मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यभरातील माध्यम प्रतिनिधींना या पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.












