- मनसेलाही सोबत घेण्याची तयारी?..
- ‘आप’कडून ‘एकला चलो रे’ चा नारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२५):- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष संयुक्तपणे निवडणुकीत उतरणार असल्याचे आघाडीतील नेत्यांनी सांगितले. शहरातील सत्तासमीकरणे आणि विरोधकांची रणनीती लक्षात घेऊन आघाडी अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे.
महाविकास आघाडी संघटनात्मक बांधणी, संयुक्त प्रचार आणि परस्पर समन्वय यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असून, सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही (मनसे) सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मनसेसोबत आघाडी झाल्यास शहरी मतदारांमध्ये प्रभाव वाढेल, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, समविचारी व घटक पक्ष एकत्र येण्यास तयार असल्यास त्यांनाही आघाडीत सामावून घेतले जाणार असल्याचे नेत्यांनी नमूद केले.
दरम्यान, आम आदमी पार्टीने (आप) स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय जाहीर केला असून शहरातील सर्व १२८ जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. ‘आप’कडून स्वतंत्र लढत दिली जाणार असल्याने निवडणुकीत तिरंगी किंवा बहुरंगी लढती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांची अंतिम बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत प्रभागनिहाय आढावा, मागील निवडणुकांचे निकाल, स्थानिक समीकरणे आणि पक्षांची ताकद लक्षात घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे. जागावाटपात लवचिक धोरण ठेवत जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देण्यावर भर दिला जाणार असल्याचे आघाडीतील सूत्रांनी सांगितले.












