- अंतिम मतदारयादी जाहीर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२५):- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रभागनिहाय मतदारसंख्येतील मोठी तफावत समोर आली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वाधिक ७५ हजार १०५ मतदारांची नोंद झाली आहे, तर प्रभाग क्रमांक २३ मध्ये केवळ ३३ हजार ३३ मतदार असून हा प्रभाग सर्वांत कमी मतदारसंख्येचा ठरला आहे.
प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चुका, दुबार नोंदी तसेच चुकीच्या प्रभागात नावे असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडे दहा हजारांहून अधिक हरकती दाखल झाल्या. निवडणूक विभागाने या सर्व हरकतींची सखोल छाननी करून दुरुस्तीची प्रक्रिया राबवली.
विशेष बाब म्हणजे शहरात सुमारे ९२ हजार दुबार मतदार आढळून आले होते. या नोंदींची खातरजमा करण्यासाठी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करण्यात आली. तपासणीनंतर चुकीच्या, दुबार तसेच अपात्र नोंदी वगळण्यात आल्या. तसेच काही मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात नोंदवली गेल्याचे आढळल्याने त्यातही सुधारणा करण्यात आली.
या प्रक्रियेमुळे काही प्रभागांतील मतदारसंख्या घटली, तर काही प्रभागांमध्ये वाढ झाली आहे. अंतिम मतदारयादी जाहीर झाल्याने आता निवडणुकीच्या तयारीला वेग येणार असून, प्रभागनिहाय राजकीय गणितांवर या बदलांचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












