- प्रभाग क्रमांक २७ अनुसूचित जाती प्रवर्गात राष्ट्रवादीकडून विवेक कांबळेंना उमेदवारी जाहीर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १८) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी) मधून विवेक सुभाष कांबळे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते इच्छुक असून, “अजितदादांचे विश्वासू शिलेदार” अशी त्यांची ओळख आहे.
विवेक कांबळे हे २०१२ पासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सक्रिय सदस्य आहेत. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी–काळेवाडी परिसरात पक्षवाढीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, नवीन मतदार नोंदणी, युवकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
उच्चशिक्षित, अभ्यासू आणि प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. प्रभागात मोठा जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची सखोल माहिती आणि सातत्याने केलेले सामाजिक कार्य यामुळे त्यांच्या नावाला पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर अनुकूलता असल्याचे बोलले जात आहे.
मूळचे मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील असलेले विवेक कांबळे हे अनेक वर्षांपासून रहाटणी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे प्रभागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, शिक्षण, युवक व रोजगाराशी संबंधित समस्यांची त्यांना अचूक माहिती आहे. या समस्या सोडवण्यासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहेत.
प्रशासकीय कार्यालयांशी असलेला चांगला संपर्क आणि समन्वयामुळे नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही स्थानिक नागरिक सांगतात. या सर्व बाबी लक्षात घेता, आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग २७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विवेक सुभाष कांबळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे.












