- महापालिका निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पथकं सज्ज…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२५):- महापालिका निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततामय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले असून, प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि विविध पथकांमध्ये समन्वय साधण्यात आला आहे.
शहरात एकूण २०३४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदार अधिकारी, शिपाई तसेच राखीव कर्मचारी नियुक्त असतील. या माध्यमातून सुमारे १० हजार २५० अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. मतदान केंद्रांची अंतिम यादी २० डिसेंबर रोजी, तर केंद्रनिहाय मतदार यादी २७ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.
निवडणूक काळात प्रचार फेऱ्या, सभा व खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडिओग्राफी सव्हॅलन्स पथके कार्यरत राहतील. मतदारांवर दबाव, प्रलोभन, पैसे किंवा मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच नाक्यांवर तपासणी पथकांद्वारे संशयास्पद हालचालींवर कडक नजर ठेवली जाणार आहे.
आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी-कर्मचारी नेमण्यात आले असून, उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत असतील. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी १३ लाख रुपयांची खर्चमर्यादा निश्चित केली आहे.
महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये पोलिस आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांचा समावेश आहे. संपूर्ण निवडणूक काळात पुरेसे आणि अतिरिक्त मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरक्षित आणि विश्वासार्ह राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.












