- वेबसाईटवर विशेष प्रणाली सुरू; घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ सहज आणि वेळेत मिळावा, यासाठी महापालिकेने ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर pcmcindia.gov.in उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या नव्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे उमेदवारांना आता महापालिकेच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. इच्छुक उमेदवार घरबसल्या ना हरकत दाखल्यासाठी अर्ज सादर करू शकणार आहेत. अर्ज करताना आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक वैयक्तिक माहिती भरावी लागणार असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने पार पाडता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ‘मनपा सार्वत्रिक निवडणूक’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ‘उमेदवारांसाठी ना हरकत दाखला प्रणाली’ या विभागातून ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
उमेदवारांना अर्ज प्रक्रिया समजून घेणे सोपे जावे, यासाठी संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने अर्ज कसा करावा, याबाबत माहिती देणारा मार्गदर्शक व्हिडीओही उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच या संकेतस्थळावर मतदार यादी, मतदार यादीतील संभाव्य दुबार नावे, आरक्षण सोडतीची माहिती, अंतिम प्रभाग रचना आणि प्रभाग रचनेशी संबंधित सविस्तर माहितीही पाहता येणार आहे.
या ऑनलाईन सुविधेमुळे उमेदवारांचा वेळ वाचणार असून, निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.












