- अजित पवारांनी घेतल्या ७०० इच्छुकांच्या मुलाखती..
- भाजप-राष्ट्रवादी स्वतंत्र लढतीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीला वेग..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२५):- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगात सुरू असून, उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ७०० इच्छुकांच्या थेट मुलाखती घेतल्या. भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पवार यांनी तातडीने रणनीती आखत शहरातील राजकीय हालचालींना गती दिली आहे.
पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे सलगपणे या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश प्रभागनिहाय राजकीय ताकद, स्थानिक समीकरणे आणि इच्छुकांची निवडणुकीसाठीची तयारी तपासणे हा होता. यामध्ये इतर पक्षांमधून राष्ट्रवादीत प्रवेश करू इच्छिणारे माजी नगरसेवक आणि नव्या चेहऱ्यांचीही चाचपणी करण्यात आली.
मुलाखतीदरम्यान अजित पवार यांनी प्रत्येक इच्छुकाशी सविस्तर संवाद साधला. संबंधित प्रभागाची भौगोलिक रचना, सामाजिक समीकरणे, मतदारसंख्या, भाजपची स्थानिक स्थिती तसेच आतापर्यंत केलेली विकासकामे याबाबत त्यांनी माहिती घेतली. “तुमची जनतेतील पकड किती आहे?”, “पक्षाने तुम्हालाच उमेदवारी का द्यावी?” आणि “मतदान वाढवण्यासाठी तुमची रणनीती काय?” अशा थेट प्रश्नांतून इच्छुकांची राजकीय क्षमता आणि आत्मविश्वास तपासण्यात आला.
या मुलाखतींच्या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास लांडे, आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, योगेश बहल, नाना काटे आणि अजित गव्हाणे यांची उपस्थिती होती. या प्रक्रियेमुळे राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीसाठी सक्षम, प्रभावी आणि जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार निवडले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.












