न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड व परिसरात रविवारी (दि. २१) तळेगाव, चाकण आणि आळंदी नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी होणार असून, बुधवारी (दि. २५ डिसेंबर) देहूरोड येथील बुद्धविहारात गौतम बुद्ध मूर्ती स्थापनेच्या ७१ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दोन्ही कारणांमुळे संभाव्य गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून विविध भागांत तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
तळेगाव वाहतूक विभागात जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन चौकदरम्यान दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. तसेच काळोखेवाडी, आदर्श विद्यालय गेट, वतननगर आणि हिंदमाता भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर निर्बंध असतील. या परिसरातील वाहतूक खांडगे पेट्रोलपंप, बेटी बचाओ सर्कल, मारुती मंदिर चौक, बीएसएनएल कॉर्नर, जुना मुंबई–पुणे महामार्ग व सिंडीकेट चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.
चाकण वाहतूक विभागात चाकण गावठाण व महात्मा फुले चौकातून येणाऱ्या वाहनांना मार्केट यार्ड व मार्केट यार्ड चौकाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. खेडकडून येणाऱ्या वाहनांना चाकण शहरात प्रवेशबंदी राहणार असून, पर्यायाने आंबेठाण पूल व नाशिक–पुणे महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिघी–आळंदी वाहतूक विभागात मरकळ, वडगाव घेणंद, देहुफाटा, योगिराज चौक व नगरपरिषद चौक परिसरातील अनेक मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे, चाकण व आळंदीच्या दिशेने जाणारी वाहने वडगाव चौक, चाकण चौक, चाळीस फुटी रोड, जोग महाराज धर्मशाळा व मरकळ–वडगाव मार्गे वळविण्यात येणार आहेत.
दरम्यान, २५ डिसेंबर रोजी देहूरोड–निगडी परिसरात विशेष वाहतूक बदल करण्यात आले असून हे निर्बंध पहाटे चार ते रात्री बारापर्यंत लागू राहणार आहेत. जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर भक्ती शक्ती चौक ते सेंट्रल चौक (देहूरोड) दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. या मार्गावरील वाहने सेंट्रल चौकातून उजवीकडे वळून बेंगळुरू महामार्गाने मुकाई चौक मार्गे जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच भक्ती शक्ती चौकातून सेंट्रल चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी लागू राहणार आहे.
पोलिस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवांतील वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी संभाव्य बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.












