- तळवडे–रुपीनगर–त्रिवेणीनगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव..
- रेडझोन हद्द, वाहतूक कोंडी झाली नित्याचीच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२५) :- देहूरोड येथील दारूगोळा कारखान्याच्या सीमेवर येणाऱ्या तळवडे, ज्योतिबानगर, गणेशनगर, रुपीनगर, सहयोगनगर आणि त्रिवेणीनगर परिसराचा समावेश रेडझोन रेषेत होत असल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ चा सर्वांगीण विकास वर्षानुवर्षे ठप्प आहे. रेडझोनच्या अडसरामुळे या भागातील बांधकामांचे नियमितीकरण रखडले असून मोठ्या विकास प्रकल्पांनाही मंजुरी मिळू शकलेली नाही. परिणामी नागरिकांना आजही मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
महापालिकेच्या हद्दवाढीत तळवडे, रुपीनगर व त्रिवेणीनगरचा समावेश झाल्यानंतर लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र त्या तुलनेत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. विशेषतः रुपीनगर व त्रिवेणीनगर परिसरात एकही उद्यान नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना विरंगुळ्याच्या जागांचा अभाव आहे. क्रीडांगण, अभ्यासिका, भाजी मंडई, व्यायामशाळा, तसेच दर्जेदार आरोग्य सुविधांचीही कमतरता जाणवते.
दरम्यान, काही ठिकाणी सकारात्मक कामे झाली आहेत. अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, भूमिगत विद्युत केबल प्रकल्प, तळवडे येथील गायरान जागेवर प्रस्तावित बायोडायव्हर्सिटी पार्क, उद्यान, अग्निशमन केंद्र, स्मशानभूमी, चौकांचे सुशोभीकरण व प्रार्थनास्थळांचे नूतनीकरण यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तथापि, तळवडे–त्रिवेणीनगर रस्त्यावरील वाहतूककोंडी, सांडपाणी व पावसाळी वाहिन्यांची जीर्ण अवस्था, अतिक्रमणामुळे अरुंद झालेले मुख्य रस्ते, खंडित वीजपुरवठा आणि सुरळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे रेडझोनची हद्द कमी करणे, प्रलंबित डीपी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणे, महापालिकेच्या आरक्षित जागांवर विकास प्रकल्प राबविणे, सीसीटीव्ही यंत्रणा, उद्यान, क्रीडांगण, विरंगुळा केंद्र व रुग्णालय उभारणीची मागणी जोर धरू लागली आहे.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये तळवडे, ज्योतिबानगर, गणेशनगर, रुपीनगर, सहयोगनगर व त्रिवेणीनगर या परिसरांचा समावेश असून एकूण ४४,६८५ मतदार आहेत. त्यामध्ये २४,६४७ पुरुष, १९,९८२ महिला व ५६ इतर मतदारांचा समावेश आहे. आरक्षणानुसार प्रभाग १२ ‘अ’ ओबीसी, ‘ब’ व ‘क’ महिला तर ‘ड’ सर्वसाधारण (खुला) असल्याने येणाऱ्या निवडणुकीत या प्रश्नांवर उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.












