- प्राधिकरण प्रभाग क्रमांक १५ मध्ये पक्षप्रवेशाच्या हालचालींमुळे वाद?..
- आयात उमेदवारांना तिकीट देण्याच्या निर्णयाविरोधात भाजपच्या निष्ठावंतांची धरणे आंदोलनाची तयारी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
संपादक व प्रतिनिधी :- अशोक लोखंडे
प्राधिकरण (दि. २० डिसेंबर २०२५) :- प्राधिकरण परिसरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक अमित गावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू मिसाळ यांना पक्षप्रवेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या दोन्ही माजी नगरसेवकांना थेट पक्षात घेऊन उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मात्र, या संभाव्य निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना डावलून ‘आयात’ उमेदवारांना थेट प्रवेश व तिकीट देण्याचा निर्णय झाल्यास त्याविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रभागातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार लवकरच धरणे आंदोलनास बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पक्षवाढीसाठी सातत्याने परिश्रम घेणाऱ्यांनाच उमेदवारीची संधी मिळावी. अन्यथा, हा निर्णय पक्षासाठी अंतर्गत असंतोष वाढवणारा ठरेल. दरम्यान, पक्षनेतृत्वाकडून याबाबत अधिकृत भूमिका जाहीर होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिकृत प्रतिक्रिया घेण्यासाठी अमित गावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्ष प्रवेशाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. मिसाळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.












