- उच्चशिक्षित, सामाजिक वारसा जपणारा तरुण चेहरा..
- रहाटणी परिसराच्या सर्वांगीण विकासाचा केलाय संकल्प…
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्युज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २१ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ (अनुसूचित जाती) मधून युवा, उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सुमित रघुनाथ डोळस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी लढवण्याची तयारी जाहीर केली आहे. “आता काम करणारा, तरुण प्रतिनिधी हवा,” या भूमिकेतून त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला आहे.
रहाटणी, श्रीनगर, तापकीरनगर आणि ज्योतिबानगर या भागांचा समावेश असलेल्या प्रभाग २७ मध्ये गेली अनेक वर्षे वास्तव्यास असलेले सुमित डोळस हे बी.ई. (मेकॅनिकल) पदवीधर असून सध्या डीएस इव्हेंट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस या व्यवसायाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील तांदळा गावचे असले तरी डोळस कुटुंब गेली ६५ वर्षांहून अधिक काळ रहाटणीमध्ये स्थायिक आहे. समाजकल्याणाचा वारसा त्यांच्या आजोबांकडून मिळाल्याचे ते अभिमानाने सांगतात.
‘स्वप्न स्वराज्याचे भैरवनाथ प्रतिष्ठान, रहाटणी’ या संस्थेच्या माध्यमातून गेली दहा वर्षे कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, धर्मशाळा व शैक्षणिक संस्थांना अन्नधान्य पुरवठा, तसेच विविध समाजघटकांसाठी उपक्रम राबवणे हे या कार्याचे वैशिष्ट्य आहे. कोरोना काळात अन्नधान्य किट, मास्क, सॅनिटायझर वाटप आणि औषध फवारणी यांसारख्या उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला.
महापालिकेवर प्रशासकीय राजवट असतानाही रस्ते, पाणी व वीज यांसारख्या नागरी प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ज्येष्ठ नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
शहराच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, पुन्हा एकदा महापालिकेचे सूत्र राष्ट्रवादीकडे यावे, यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे सुमित डोळस यांनी स्पष्ट केले.
“नगरसेवक पद म्हणजे केवळ कामे मंजूर करणे नव्हे, तर नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे,” असे सांगत प्रभाग हाच आपले कुटुंब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. युवक नेतृत्व, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन यामुळे प्रभाग २७ मध्ये सुमित डोळस यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे.












