- दहा हजारांहून अधिक हरकतीनंतरही दोषी कर्मचाऱ्यांना ‘अभय’..
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या चुकांमुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या गंभीर घोळाप्रकरणी तब्बल दहा हजारांहून अधिक हरकती दाखल होऊनही एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर विधानसभा मतदारसंघांच्या १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार याद्या महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. त्या आधारे १ ते ३२ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, याद्यांची विभागणी करताना कर्मचाऱ्यांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली. काही ठिकाणी माजी नगरसेवकांची नावेही चुकीच्या प्रभागात नोंदवण्यात आल्याचे उघड झाले.
या प्रकाराविरोधात महाविकास आघाडीकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. मतदार याद्यांची होळी करून महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आला. या घोळामुळे एकूण १० हजार २८८ हरकती दाखल झाल्या. त्यानंतर प्रशासनाने हरकतींचा निपटारा करून २० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.
मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात चुका होऊनही जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न झाल्याने संशय व्यक्त होत आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांना विचारणा केली असता, “प्राप्त हरकतीनुसार योग्य ती दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही,” असे उत्तर त्यांनी दिले.
या भूमिकेमुळे प्रशासनाने चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणुकीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत झालेल्या चुका केवळ दुरुस्त करून मोकळे होणे योग्य आहे का, असा सवाल आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.












