- रावेत–किवळे–मामुर्डी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनकडून पक्षनिरपेक्ष लढ्याचा निर्धार..
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये रावेत–किवळे–मामुर्डी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने थेट उमेदवार जाहीर करून राजकीय वातावरणात खळबळ उडवली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी न ठेवता, केवळ नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार फेडरेशनने व्यक्त केला आहे.
रावेत–किवळे–मामुर्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले असले, तरी हजारो सोसायटीधारकांना आजही नियमित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, अग्निसुरक्षा आणि लिफ्ट सुरक्षेच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत थेट नागरिकांचा सहभाग नसल्याची खंत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
“आमच्या प्रश्नांवर लढण्यासाठी आम्ही स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी सोसायटीधारक पुरस्कृत उमेदवार देत आहोत. जे राजकीय पक्ष आमच्या उमेदवारांना पाठिंबा देतील, त्यांनाच फेडरेशनचा पाठिंबा राहील,” अशी स्पष्ट भूमिका फेडरेशनचे सचिव अमोल कालेकर यांनी मांडली.
फेडरेशनने जाहीर केलेल्या अजेंड्यानुसार प्रत्येक फ्लॅटला किमान एक हजार लिटर पाणीपुरवठा, टँकर माफियावर नियंत्रण, कचरा संकलन व ड्रेनेज व्यवस्थेची सुधारणा, दरवर्षी अग्निसुरक्षा तपासणी, लिफ्ट सुरक्षेची सक्ती यांना प्राधान्य दिले जाणार आहे. गरज भासल्यास जनहित याचिकेद्वारे न्यायालयीन लढाही उभारला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
“कर आम्ही भरतो, सुविधा मिळायलाच हव्यात,” या ठाम भूमिकेसह कोणत्याही राजकीय दबावाशिवाय केवळ सोसायटीधारकांच्या हितासाठी काम करणारे प्रतिनिधी महापालिकेत पाठवण्याचा निर्धार फेडरेशनने व्यक्त केला आहे. स्थानिक रहिवाशांचा थेट सहभाग हेच आपले खरे बळ असल्याचा विश्वास फेडरेशनने व्यक्त केल्याने प्रभाग १६ मधील निवडणूक यंदा अधिक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.












