- प्रभाग क्रमांक २६ साठी सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा…
- महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक ते स्मार्ट सोसायटीपर्यंत विकासाचे ठोस नियोजन…
मा. अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर आणि स्पष्ट ‘व्हिजन डॉक्युमेंट’ जाहीर केले आहे. वाकड, कस्पटे वस्ती, विशाल नगर, जगताप डेअरी आणि पिंपळे निलख या वेगाने विकसित होत असलेल्या भागांना खऱ्या अर्थाने स्मार्ट आणि नागरिकाभिमुख बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
रणजित (आबा) कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या सौ. स्नेहा कलाटे या डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवीधर असून, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात त्या सातत्याने कार्यरत आहेत. स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या विचारांची प्रेरणा आणि चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक केंद्रस्थानी..
महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनसह प्रसाधनगृहे, बचत गटांसाठी स्वतंत्र मार्केट, उद्योग प्रशिक्षण व रोजगार संधी, महिला सुरक्षा पथक व हेल्पलाईन सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बहुउद्देशीय हॉल, विरंगुळा केंद्र, आरोग्य तपासणी शिबिरे, वाचनालय आणि आपत्कालीन हेल्पलाईन सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
युवक-युवतींसाठी सुसज्ज अभ्यासिका, लायब्ररी, रोजगार मेळावे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे हे व्हिजनचे महत्त्वाचे घटक आहेत.
आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणावर भर…
स्वच्छ प्रभागासाठी महास्वच्छता अभियान, ओपीडी सुविधा, स्वतंत्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ब्लडबँक उभारणी, ओपन जिम व सार्वजनिक व्यायामशाळा, महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट मांडण्यात आले आहे.
महापालिकेच्या शाळांचे डिजिटलायझेशन, शाळांची स्वच्छता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि फायर सेफ्टी ऑडिटलाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
पाणी, कचरा आणि पायाभूत सुविधा…
समान व मुबलक पाणीपुरवठा, कचऱ्याचे वेळेवर संकलन, कंपोस्ट निर्मिती, प्लास्टिकमुक्त प्रभाग, खड्डेमुक्त रस्ते, मोकळे पदपथ, उत्तम बस स्थानके, सुंदर उद्याने व मैदाने विकसित करण्याचा आराखडा व्हिजनमध्ये समाविष्ट आहे.
स्मार्ट सोसायटी – स्मार्ट प्रभाग…
आमदार निधीतून बोअरवेल, स्विमिंग पुलाची उभारणी, सोलर पॅनल, ई-वाहन चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आणि दरवर्षी ‘स्मार्ट सोसायटी स्पर्धा’ आयोजित करण्याचा संकल्प सौ. कलाटे यांनी जाहीर केला आहे.
कायदा-सुव्यवस्था व व्यापारी सुविधा…
स्वतंत्र पोलीस स्थानक, संपूर्ण प्रभाग सीसीटीव्हीच्या कक्षेत आणणे, कंट्रोल रूम, विशेष हेल्पलाईन, भाजी मंडई व बहुमजली पार्किंग उभारणी यावरही भर देण्यात आला आहे.
“विकास म्हणजे केवळ इमारती नव्हे, तर सुरक्षितता, सुविधा आणि संधी,” अशी भूमिका मांडत सौ. स्नेहा कलाटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. स्पष्ट व्हिजन, शिक्षण आणि सामाजिक अनुभवाच्या जोरावर प्रभाग २६ मध्ये त्यांची उमेदवारी विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.












