- जुन्या वादातून घरात घुसून मारहाण; काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार..
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. २२ डिसेंबर २०२५):- थेरगाव येथील शिवशंभो कॉलनी परिसरात तिघांनी मिळून एका चालकावर घरात घुसून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे थेरगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजताच्या सुमारास थेरगाव येथे घडली. फिर्यादी विजय नाना लष्कर (वय ४२, व्यवसाय चालक) हे घरी असताना आरोपी तुषार पांडुरंग साठे, साई लाड आणि राहुल गिरिशचंद्र आग्रवाल यांनी त्यांच्या घरी जाऊन “तू फार शहाणा झालास काय, काल कुठे पळून गेला होतास?” असे म्हणत वाद घातला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर, तोंडावर व डोळ्यांवर बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचे दोन दात पडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर फिर्यादीने काळेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.












