- सासूचे घर विकून पैसे आणण्याच्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न…
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २२ डिसेंबर २०२५):- काळेवाडी परिसरात हुंड्याच्या मागणीवरून विवाहित महिलेवर अमानुष मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपी पती संदेश लाजरस चोपडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे घडली. आरोपी संदेश चोपडे याने सासूचे घर विकून पैसे आणावेत, या कारणावरून पत्नीशी वाद घालत शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने संपूर्ण शरीरावर व तोंडावर मारहाण केली.
इतकेच नव्हे तर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घरातील मोठ्या कुलूपाने फिर्यादीच्या डोक्यावर ठिकठिकाणी वार करत तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलेवर उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.












