- झपाट्याने विकास साधूनही मूलभूत प्रश्नांची साखळी कायम…
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९७ साली समाविष्ट झालेल्या मामुर्डी, किवळे, रावेत व प्राधिकरण परिसराचा गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. विशेषतः रावेत प्राधिकरणातील सेक्टर २९ ते ३२ या भागांत रस्ते, बीआरटी, सब-वे, सीसीटीव्ही, स्मार्ट रस्ते यांसारख्या सुविधांमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला. मात्र, या झगमगाटामागे काही भाग आजही विकासाच्या प्रवाहाबाहेर राहिल्याने संपूर्ण प्रभागाची अवस्था ‘कुठे समाधान, कुठे नाराजी’ अशीच आहे.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबे, कामगार वर्ग तसेच आयटी क्षेत्रातील अभियंते मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. मुख्य रस्ते, बीआरटी मार्ग, पाण्याच्या टाक्या, उद्याने व क्रीडांगणे यामुळे विकासाची गती दिसते; परंतु अनेक आरक्षित जागांचा प्रत्यक्ष विकास न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. प्राधिकरण–रावेत–किवळे जोडणारे रस्ते चकचकीत झाले असले तरी अंतर्गत रस्त्यांच्या जागा ताब्यात न आल्याने अनेक ठिकाणी रस्ते अर्धवट राहिले आहेत. परिणामी, एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. एकीकडे वाढता विकास, तर दुसरीकडे प्रलंबित प्रश्न – याच दुहेरी वास्तवात प्रभाग क्रमांक १६ आज उभा आहे.
या प्रभागात मामुर्डी, किवळे, रावेत, प्राधिकरण, गुरुद्वारा चौक, गुरुदत्त चौक, चिंतामणी चौक व वाल्हेकरवाडी हे भाग समाविष्ट आहेत. काही ठिकाणी क्रीडांगण, उद्यान, गॅस पाइपलाइन, पोलिस ठाणे, भूमिगत वीजवाहिन्या यांसारखी कामे मार्गी लागली असली तरी मेट्रो प्रकल्प, स्वतंत्र महावितरण केंद्र, अग्निशमन केंद्र, नदी सुधार प्रकल्प व सार्वजनिक वाहतुकीची प्रभावी व्यवस्था अजूनही रखडलेली आहे.
नागरिकांकडून महापालिकेचे रुग्णालय, मामुर्डी व किवळे भागात उपकेंद्र, उड्डाणपूल, नवीन शाळा, अंतर्गत रस्त्यांवर सीसीटीव्ही, पुरेसा पाणीपुरवठा, पावसाळ्यात पाणी तुंबण्यावर कायमस्वरूपी उपाय आणि मुकाई चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्याची ठोस मागणी होत आहे.
प्रभाग आरक्षण व मतदारसंख्या…
प्रभाग १६ अ अनुसूचित जातीसाठी, १६ ब ओबीसी महिलांसाठी, १६ क महिलांसाठी तर, १६ ड खुला आहे. एकूण ७५,१०५ मतदारांपैकी ३९,२२४ पुरुष, ३५,८७५ महिला आणि ६ इतर मतदार आहेत.












