- सत्ता, पदे उपभोगूनही डॉ. कैलास कदम यांनी ऐनवेळी पक्षाला एकाकी पाडले?..
- स्वतःचा मार्ग मोकळा करून पक्षाला सोडल रणांगणात एकटं?…
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २२ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजत असतानाच पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी अचानक शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसकडून पदे, सत्ता, उमेदवारी आणि राजकीय प्रतिष्ठा उपभोगल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर जबाबदारी झटकणे म्हणजे पक्षाच्या पाठीवर खंजीर खुपसण्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया पक्षातून उमटत आहे.
७ ऑक्टोबर २०२१ रोजी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या आदेशाने आणि राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या पत्रानुसार डॉ. कैलास कदम यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. पक्ष अत्यंत अडचणीत असताना संघटनाची संपूर्ण धुरा त्यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. मात्र, महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना त्यांनी “वैयक्तिक कारणे” पुढे करत पदत्याग केल्याने काँग्रेसच्या संघटनात्मक ढाच्यालाच तडे गेल्याचे चित्र आहे.
डॉ. कैलास कदम यांच्या राजकीय वाटचालीकडे पाहिले असता काँग्रेसने त्यांच्यावर सातत्याने विश्वास टाकल्याचे स्पष्ट दिसते. १९९७ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना बिनविरोध व निवडून आणण्यात त्यांची भूमिका राहिली. २००७ मध्ये निर्मला कदम, २०१२ मध्ये स्वतः डॉ. कैलास कदम तसेच सद्गुरु कदम यांना काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आणण्यात आले. याच काळात डॉ. कदम यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गटनेतेपद आणि विरोधी पक्षनेतेपदही बहाल करण्यात आले. २०१४ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारीसुद्धा काँग्रेसने त्यांना दिली होती.
इतके सगळे राजकीय लाभ घेतल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणे म्हणजे “स्वतःचा मार्ग मोकळा करून पक्षाला रणांगणात एकटे सोडणे” असल्याची टीका आता उघडपणे होत आहे. काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून, “पक्षाने सर्व दिले, पण गरज असताना साथ सोडली” असा आरोप केला जात आहे.
डॉ. कैलास कदम यांनी आपण काँग्रेसचे प्राथमिक सदस्य म्हणून काम करत राहणार असल्याचे सांगितले असले, तरी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोडल्याने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठे नुकसान होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा कणा असलेले पद ऐनवेळी सोडून देणे हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीवर थेट आघात करणारे पाऊल असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.












