- दोन सदस्य गैरहजर राहिल्याने चक्क सभाच तहकूब…
- शहर अभियंता पदाच्या प्रस्तावासह तीन महत्त्वाचे विषय लांबणीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. समितीचे दोन सदस्य सभेला अनुपस्थित राहिल्यामुळे शुक्रवारी (दि. ३) नियोजित विधी समितीची सभा तहकूब करण्यात आली. परिणामी शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले तीन विषय कोणताही निर्णय न घेता लांबणीवर पडले आहेत.
विधी समितीच्या सभेसमोर पदोन्नती समितीने शहर अभियंता पदासाठी केलेल्या शिफारशीला मान्यता देण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पदोन्नती समितीच्या बैठकीत सहशहर अभियंता सेठिया यांच्या नावाची शहर अभियंता पदासाठी शिफारस करण्यात आली असून, त्यानुसार महापालिका आयुक्तांनी विधी समितीपुढे अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र, सभा तहकूब झाल्याने या नियुक्तीवरील निर्णयही पुढे ढकलण्यात आला.
याशिवाय महापालिकेच्या भंगार साहित्य विक्रीस मंजुरी देण्याचा प्रस्ताव आणि वाकड येथील महापालिका शाळेच्या सुधारित ३५ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा महत्त्वाचा प्रस्तावही सभेसमोर होता. हे दोन्ही प्रस्तावही निर्णयाअभावी प्रलंबित राहिले आहेत.
केवळ दोन सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे संपूर्ण सभा तहकूब करावी लागणे, ही बाब महापालिकेच्या समिती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
“विषयपत्रिकेवर तीन विषय होते. दोन नगरसेवक सभेस उपस्थित नव्हते. सभा तहकूब करण्यात आली आहे.”
– सुजाता निलेश बोराटे, सभापती, विधी समिती मनपा…
















