न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०४ जुलै २०२६) :- मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरात भरधाव वेगातील दुचाकी घसरल्याने १७ वर्षीय सरंजली प्रकाश कराळे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दुचाकी चालक यश बाळासाहेब निकम (वय २१, रा. मेदनकरवाडी, चाकण) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास संभाजी महाराज पुतळ्यासमोरील रस्त्यावर यश निकम हा बजाज पल्सर (एमएच-१४ एमएक्स-४९५४) दुचाकीवर सरंजली कराळे व आणखी एका मैत्रिणीसह जात होता. भरधाव वेग आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने दुचाकी घसरून तिघेही रस्त्यावर पडले. या अपघातात सरंजलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.















