- माजी नगरसेवक विनोद नढे यांच्या भाजप प्रवेशानंतर प्रचाराला जोर..
- प्रभागात भव्य प्रचार यात्रा, महिलांसह तरुणांचा मोठा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ डिसेंबर २०२५) :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात सामील झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या घडामोडींचे पडसाद येत्या पंचवार्षिक निवडणुकीत उमटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याचे ठळक उदाहरण म्हणजे काळेवाडीतील प्रभाग क्रमांक २२. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक विनोद जयवंत नढे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाला स्थानिक भाजपमधील कोणत्याही इच्छुक नगरसेवकांनी विरोध केला नाही. उलट, नढे यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढल्याची भावना व्यक्त करत सर्वांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
रविवारी काळेवाडी येथील पंचनाथ चौकातून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे आजी-माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सोमवारी प्रभाग क्रमांक २२ मधील उमेदवार विनोद जयवंत नढे यांच्या प्रचारार्थ ज्योतिबा नगर, श्री विठ्ठल-रुक्मिणी कॉलनी, ज्योतिबा कॉलनी, अभियंता कॉलनी, अविनाश मंगल कार्यालय परिसर तसेच काळेवाडी गावठाण येथे भव्य प्रचार यात्रेला सुरुवात झाली. ठिकठिकाणी फटाके वाजवून, महिलांनी औक्षण करून नढे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रचारात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता; तसेच वडीलधारी, ज्येष्ठ नागरिक व महिलांचीही मोठी उपस्थिती दिसून आली.
अनेक वर्षे ज्या पक्षात काम केले, त्या पक्षातील सहकाऱ्यांच्या विरोधात आता निवडणूक लढवावी लागत असल्याने या लढतीकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील ही निवडणूक येत्या काळात शहराच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरेल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.












