न्यूज पीसीएमसी नेटवर्क
ताथवडे (दि. ०४ जुलै २०२६) :- ताथवडे येथील अशोकनगर परिसरात पत्नीशी असलेल्या कथित प्रेमसंबंधाच्या वादातून ३१ वर्षीय कारपेंटरवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी २७ वर्षीय आरोपी सुरज वैच्या सरदार याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास रोहन बिल्डरच्या जागेत ही घटना घडली. फिर्यादीने आरोपीला “माझ्या पत्नीशी असलेले संबंध तोड” असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपीने “तुला जिवंत सोडत नाही” अशी धमकी देत खिशातील चाकूने फिर्यादीच्या डाव्या हातावर व डाव्या बरगडीजवळ वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक झिंजके पुढील तपास करत आहेत.















