- घराणेशाहीविरोधात महिलांचा संताप..
- अजित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली, तरी युती-आघाड्यांचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक प्रभागांतील उमेदवारांच्या नावांवर एकमत न झाल्याने मुलाखती आणि बैठकींचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उमेदवारीत घराणेशाहीला प्राधान्य दिले जात असल्याच्या आरोपांमुळे वातावरण तापत चालले आहे.
याच मुद्द्यावर पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक ९ मधील महिलांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सुपुत्राच्या संभाव्य उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. “आमच्या वॉर्डात आमदार बनसोडेंचा पोरगा नको, कष्टकऱ्यांतूनच उमेदवार हवा,” अशा स्पष्ट घोषणा देत महिलांनी आपला संताप व्यक्त केला.
मंगळवारी पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे सुरू असलेल्या बैठकीदरम्यान पिंपरी-चिंचवडमधील कष्टकरी महिलांनी थेट उपस्थित राहून घराणेशाहीविरोधात आवाज उठवला. अजित पवार यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न करूनही भेट न मिळाल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. “विधानसभेवेळी दिलेली आश्वासने विसरली गेली आहेत,” असा आरोप करत महिलांनी अजित पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
“आम्ही कष्टकरी स्त्रिया आहोत. आमच्यातूनच उमेदवार हवा. बाबा कांबळे आमच्यासाठी सातत्याने काम करतात. त्यांनाच उमेदवारी द्यावी,” अशी ठाम मागणी महिलांनी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब कांबळे यांच्या नावाला त्यांनी उघड पाठिंबा दर्शवला. “आता आम्हाला चॉकलेट नको, हक्काचा प्रतिनिधी हवा,” अशा शब्दांत महिलांनी आपली भूमिका मांडली.
‘लाडकी बहीण’ म्हणत असाल तर मग आमचे ऐकत का नाही? आमच्या मताला किंमत का दिली जात नाही? असे सवाल उपस्थित करत महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाला थेट जाब विचारला. या घटनेमुळे प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवारीचा प्रश्न अधिकच चिघळण्याची चिन्हे असून, घराणेशाहीविरोधातील हा रोष आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












