- निवडणूक प्रचारात पारदर्शकता राखण्यासाठी आयोगाचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रचार प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली. या समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, तर सदस्य सचिवपदी विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक काळात उमेदवारांच्या इलेक्ट्रॉनिक व डिजिटल जाहिरातींचे पूर्वप्रमाणन, तसेच ‘पेड न्यूज’ प्रकारांवर देखरेख ठेवणे हे समितीचे प्रमुख काम असेल. सोशल मीडियावरील प्रचारासाठीही पूर्वपरवानगी बंधनकारक असून, नियमभंग झाल्यास संबंधित पक्ष किंवा उमेदवाराच्या खर्चात तो समाविष्ट केला जाणार आहे. द्वेषपूर्ण मजकूर, आचारसंहिता भंग व कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या पोस्टवरही कारवाई केली जाणार आहे.
समितीचे कार्यालय पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय भवनातील माहिती व जनसंपर्क विभागात कार्यान्वित असून, आवश्यक अर्ज व मार्गदर्शक सूचना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.












