- माजी उपमहापौर सचिन चिंचवडेंकडून अर्ज दाखल…
- सार्वजनिक सुट्टीमुळे उद्या अर्ज स्वीकृती राहणार बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज मंगळवारी (दि. २४) एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाला आहे. प्रभाग क्रमांक १७ (ड) मधून सचिन बाजीराव चिंचवडे (भारतीय जनता पक्ष) यांनी आपला अर्ज सादर केला आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन दिवसांत दाखल झालेल्या अर्जांची एकूण संख्या एक एवढी आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन अर्जांचे वितरण व स्वीकृती प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. अर्ज वितरणाच्या पहिल्या दिवशी तब्बल ८७५ इच्छुक उमेदवारांनी २ हजार २१२ अर्ज नेले होते. मात्र, त्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता.
आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रभागनिहाय एकूण १ हजार ४३३ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. सर्वाधिक अर्ज वितरण ह क्षेत्रीय कार्यालयात (३१३) झाले, तर इतर क्षेत्रीय कार्यालयांतही मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत.
दरम्यान, उद्या दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक विभागाकडील नामनिर्देशन अर्जांची स्वीकृती प्रक्रिया बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.












