मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ डिसेंबर २०२५) :- तडीपार आदेशाचा भंग करून बेकायदा पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी शंतनू उर्फ आदित्य दिनेश गायकवाड (वय २१, रा. नखाते वस्ती, रहाटणी) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी पहाटे सुमारास एम.एम. चौक ते थेरगाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, जगतापनगर परिसरात, संशयित हालचाली आढळताच पोलिसांनी कारवाई केली. तपासादरम्यान आरोपीकडून अंदाजे २७ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पिस्तुलावर निर्माता क्रमांक किंवा ओळखचिन्ह नसल्याचेही समोर आले.
उल्लेखनीय म्हणजे, पिंपरी-चिंचवड परिमंडल-२ चे उपआयुक्त यांच्या आदेशान्वये आरोपीला २५ जून २०२५ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीदेखील त्याने हद्दीत प्रवेश करून आदेशाचा भंग केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मनाई आदेश असताना शस्त्र बाळगल्याने संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस नाईक भारत बाळासाहेब पारधी यांच्या फिर्यादीवरून काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि गुरव करीत आहेत.












