मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ डिसेंबर २०२५) :- पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिकांना चारधाम यात्रेसाठी कमी दरात हेलिकॉप्टर व्यवस्था करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ११ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पर्यटन व्यवसायिकाविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्रनाथ जस्वाल आणि त्यांच्यासह हास्य क्लबमधील एकूण ५४ जणांनी, आरोपी योगेश प्रभाकर देशमुख (भक्ती दर्शन टूर्स) याच्याकडे प्रत्येकी ४५ हजार रुपये चारधाम यात्रेसाठी दिले. रक्कम ऑनलाइन तसेच रोखीने स्वीकारण्यात आली.
पैसे घेतल्यानंतर आरोपीने केवळ २८ जणांना यात्रा घडवून आणली. त्यापैकी १६ जणांकडून हेलिकॉप्टर सेवेसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये (एकूण २.४० लाख) अतिरिक्त रक्कम घेतली, मात्र हेलिकॉप्टर सेवा दिली नाही आणि पैसेही परत केले नाहीत.
दरम्यान उरलेल्या २६ जणांपैकी केवळ ५ जणांचे २.२५ लाख रुपये परत करण्यात आले, तर उरलेल्या २१ जणांचे ९.४५ लाख रुपये परत न करता विलंब लावल्याचे फिर्यादींनी सांगितले. पुढील तपास पोउपनि चापाले करीत आहेत.












