- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वीप उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
-
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ डिसेंबर २०२५) :- लोकशाही उत्सवाला साजेसा रंग भरत कला, ताल आणि जनसंवादाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढाकारातून चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडला. स्वीप अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली असून १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जास्तीत जास्त मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिका आयुक्त व निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली शहरभर मतदान जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
एल्प्रो मॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात आकर्षक फ्लॅश मॉब आणि प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. मतदानाचे महत्त्व, जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाची भूमिका आणि मतदानाचा लोकशाही प्रक्रियेवर होणारा परिणाम या मुद्द्यांवर कलात्मक पद्धतीने संदेश देण्यात आला. मॉलमध्ये आलेल्या नागरिकांनी, तरुणांनी आणि कुटुंबांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपायुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते. एल्प्रो मॉलचे केंद्र संचालक निशांत कन्सल यांच्यासह नागरिकांचीही सहभाग नोंदवण्यात आली.
मतदानाची शपथ…
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांना लोकशाही परंपरा जपण्याची आणि प्रत्येक निवडणुकीत निर्भय, निःपक्षपाती मतदान करण्याची मतदान शपथ देण्यात आली.
“मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत. सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास हे उपक्रम उपयुक्त ठरत आहेत.”
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त…“कला आणि संवादाच्या माध्यमातून दिलेला मतदानाचा संदेश अधिक परिणामकारक ठरतो. नागरिकांच्या जागरूक सहभागातूनच लोकशाही बळकट होते.”
– अण्णा बोदडे, उपायुक्त..












